महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ पैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भवानी (भगवती) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता , प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दैवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
तुळजाभवानी मातेची मूर्ती गंडकीशिळेची असून तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्याआहेत. श्री तुळजाभवानी देवीच्या आठ हातात त्रिशूल, बिचवा, बाण,चक्र ,शंख ,धनुष्य ,पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. देवीच्या पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. देवीच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषी ची मूर्ती दिसते.
श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लघनाच्या वेळी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते.
