श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजीमहाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊमहाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुखतीर्थयेथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळतीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायकआहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णादेवीचे मंदिरही त्याच बरोबर श्री दत्त मंदिर येमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरात लक्ष वेधून घेतात.
पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्यगाभाऱ्याचादरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते.
