श्री तुळजा भवानी मंदिर

About Tuljabhavani Mandir

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ पैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भवानी (भगवती) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता , प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दैवता अशी ही  तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
तुळजाभवानी मातेची मूर्ती गंडकीशिळेची असून तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्याआहेत. श्री तुळजाभवानी देवीच्या आठ हातात त्रिशूल, बिचवा, बाण,चक्र ,शंख ,धनुष्य ,पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. देवीच्या पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. देवीच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषी ची मूर्ती दिसते.
श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती  ही चल मूर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लघनाच्या वेळी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते.

श्री तुळजा भवानी मंदिर इतिहास

हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. १३९७ सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार १५३ पाळीकर, भोपे कुळाकडे आहेत.

वैशिष्ट्ये

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुखतीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही त्याच बरोबर श्री दत्त मंदिर येमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरात लक्ष वेधून घेतात.
पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते.

वैशाख शुध्द‍ तृतीया (अक्षय तृतीया )

अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस व पितृ पुजनाचा दिवस असल्याने श्रीस अभिषेक पुजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात .दिवसभराचे कार्यक्रम करण्यात येतात. संध्याकाळी देवीचा छबिना काढण्यात येतो.

गोमुख तीर्थकुंड

गोमुख तीर्थकुंडात गायीच्या मुखातून पाण्याची धार सतत अखंडपणे वाहत असते. या तीर्थामध्ये भाविक दर्शनाला जाण्यापूर्वी येते स्नान करतात तसेच हातपायही धुतात .

होम कुंड (यज्ञ मंडप)

होम कुंडाचे मंदिर पुरातन हेमाडपंथी पद्धतीचे आहे. होम कुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेश मूर्ती आहे. होम कुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.

चिंतामणी दगड

तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे हा दगड आहे त्याला आपण चिंतामणी दगड असे म्हणतो. हा चिंतामणी दगड सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात या दगडावर ठेवायचे आहेत. यानंतर आपण आपल्या मनातील प्रश्न आपण आपल्या मनातच विचारावा. त्यानंतर जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तो दगड उजव्या बाजूला फिरतो आणि जर उत्तर नाही असेल तर तो दगड डावीकडे फिरतो आणि जर दगड जागीच राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ असतो.

प्रेक्षणीय स्थळे

काळभैरव

हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे. भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.

आदिमाया व आदिशक्ति

देवळाच्या मुख्य द्वाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ह्या देवता आहेत.

घाटशीळ

डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आत देवीच्या पादुका आहेत. घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला. तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला 'तू का आई?’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत. जवळच मंदिर संस्थानने बांधलेली बाग आहे.

रामवरदायिनी

येथे रामवरदायिनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सीतेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असताना या देवीने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवला.

भारतीबूवाचा मठ

देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो. याचे मूळ पुरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सारीपाट खेळत असे. मठ जुना, मजबूत व प्रेक्षणीय आहे.

मंकावती तीर्थ

मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे. असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेही म्हणतात. यावर महादेवाची पिंड आहे. तसेच मोठे मारुती मंदिर आहे.

गरीबनाथाचा मठ

हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.

नारायणगिरीचा मठ

हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथील क्रांती चौकात आहे.

पापनाश तीर्थ

हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे. येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे. देऊळ जुने पण मजबूत आहे.

धाकटे तुळजापूर

येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते